आई तूच जगद्गुरू : रेणुका दत्ता
पुणे, दि. १९ : ‘चुकल्यावर तू शिक्षा केलीस, समजावले ही तूच, बक्षीस म्हणून पाठीवरील थाप तुझी, सोन्याचा मुकुट जणू, मार्गदर्शन तुझे, तुझ्याबरोबरीने प्रयत्न माझे, अविरथ प्रगतीपथावर नेलेस तू, तूच माझी पहिली गुरू, आई तूच जगद्गुरू” या पर्यवेक्षिका मुग्धा
अभ्यंकर यांनी लिहिलेल्या ओळींचा जाणीवपूर्वक उल्लेख करून आईच्या महतीचा गौरव प्राचार्या रेणुका दत्ता यांनी केला.
झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा इंग्लिश माध्यम शाळेत आज गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. आजच्या कार्यक्रमाची संकल्पना होती ‘आई’. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सुमनताई काटकर, निर्माते-दिग्दर्शक श्री अमोल थोरात उपस्थित होते.
सरस्वती वंदनाने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्या रेणुका दत्ता म्हणाल्या, ‘आईच्या प्रत्येक भूमिका निरीक्षण करण्याजोग्या असतात. कारण त्यातूनच आईची थोरवी व आईचे आईपण अधोरेखित होते. आई आई असते, आई मैत्रीण असते, आई शिक्षक असते, आई मार्गदर्शक असते, त्यामुळे जीवनात कितीही मोठे संकट आले तरीही आपण त्यातून सहज तरून जाण्याची शिकवण आईकडून मिळते. आई आपण कितीही
मोठे झालो तरीही, आई कधीच छोटी होत नाही.’ याप्रसंगी नववीची विद्यार्थिंनी संस्कृती काकडे या विद्यार्थिनीने कार्यक्रम संपेपर्यंत ‘आई हा वटवृक्ष’ हे चित्र काढून आईबद्दलची भावना व्यक्त केली. ‘एक नविन पहाट’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला आणि क्रीडा शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सेविका राधा भारती यांनी आईवर आधारित कवितेचे गायन केले.
शाळेचे संस्थापक श्री एस. एम. काटकर, सचिव श्री जयेश काटकर, कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अनुराधा टल्लू, पर्यवेक्षिका मुग्धा अभ्यंकर, नीलिमा भिंगारदिवे, नंदिता ब्रह्मा उपस्धित होते. प्रास्ताविक दीपाली लिमये, अलिशिबा भालेकर यांनी, तर सूत्रसंचालन कावेरी भणगे आणि अक्षता जगताप यांनी केले. आभार प्रदर्शन अपूर्वा पित्रे यांनी केले.