मुलांच्या किलबिलाटाने शाळा बहरली
करोना आणि लॉकडाऊन नंतर तब्बल वर्षभर घरूनच शिक्षण घेणारे विद्यार्थी शाळेत दाखल होऊ लागले आणि या मुलांच्या किलबिलाटाने शाळेचे हे ज्ञानमंदिर पुन्हा बहरून गेले. हिंगणे येथील झील एज्युकेशन सोसायटीच्या ज्ञानगंगा इंग्रजी माध्यमाची शाळा सुरक्षित वावराचे नियम पाळून पुन्हा सुरू झाली.करोना महामारीमुळे गेले जवळपास वर्षभर शाळा बंद होती. मुलांच्या शिक्षणाला याचा फटका बसू नये, यासाठी ज्ञानगंगा शाळेने सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षणाचा लाभ विद्यार्थी घेत होते. मात्र, करोनाचा प्रभाव ओसरू लागल्यानंतर गेल्या महिन्यात नववी आणि दहावीचे वर्ग सुरू झाले. त्यापाठोपाठ एक फेब्रुवारी रोजी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही शाळेत येण्यास परवानगी मिळाली. विद्यार्थी आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शाळेने काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी संस्थापक एस.एम. काटकर, झील एज्युकेशन सोसायटीचे सचिव जयेश काटकर, कार्यकारी संचालक प्रदीप खांदवे, मुख्याध्यापिका रेणुका दत्ता, पर्यवेक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. असे सर्व सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच वर्ग सुरू झाले आहेत.